भोपाळ - मध्यप्रदेशातील गुना जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयाच्या अनास्थेमुळे एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. उपचार घेण्याआधी पैसे भरण्यास पत्नी असमर्थ ठरल्यामुळे डॉक्टरांनी रुग्णाकडे लक्ष दिले नाही. मात्र, त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.
मृत तरुण गुना शहरातील अशोक नगर भागात राहायला होता. त्याची पत्नी आरती रजकने सांगितले की, पतीची प्रकृती मागील काही दिवसांपासून खराब असल्याने गुना जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, मंगळवारी सायंकाळी अचानक प्रकृती पुन्हा ढासळल्याने रुग्णालयात दाखल केले. मात्र, आधी पैसे भरल्याची पावती घ्यायला सांगितले. मात्र, माझ्याकडे पैसे नसल्याने डॉक्टरांनी उपचार केले नाहीत, असा आरोप मृत तरुणाच्या पत्नीने केला आहे.
जर वेळेवर उपचार भेटले असते तर पतीचे प्राण वाचले असते, असे मृत तरुणाच्या पत्नीने सांगितले. या प्रकरणी गुना जिल्हा रुग्णालयाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.