मदुराई - तामिळनाडूत सध्या जलिकट्टू खेळाचा थरार सुरू आहे. या खेळदरम्यान वळूने मारल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू झाला आहे. अलंगनल्लूर शहरात आयोजित केलेल्या स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. विशेष म्हणजे हा मृत्यू झालेल्या तरूणाने स्पर्धेत भाग घेतला नव्हता. खेळ पाहत असताना वळूने त्याच्यावर हल्ला केला.
१६ जानेवारीपासून जलिकट्टूला सुरूवात -
नवमनी असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. १६ जानेवारीपासून तामिळनाडूमध्ये जलिकट्टू खेळास सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री पलानस्वामी यांनी खेळाचे उद्घाटन केले. दरवर्षी जानेवारी महिन्यात संक्रांत म्हणजेच दक्षिण भारतात पोंगल सन साजरा केला जातो. याकाळात जलिकट्टू या खेळाचे आयोजन केले जाते.
वळूवर नियंत्रण मिळवण्याचा थरार -
खेळात सहभाग घेतलेल्यांकडून बेभान झालेल्या वळूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. जो जास्त वेळ वळूवर ताबा मिळवले त्याला बक्षिस दिले जाते. या खेळात धोका जास्त असून अनेक जण गंभीर जखमी होतात. तर काहींचा मृत्यू झाल्याच्या घटना या आधाही घडल्या आहेत. २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाने जलिकट्टू खेळावर बंदी घातली होती. मात्र, पुन्हा खेळास परवानगी देण्यात आली. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोविड नियमावलीचे पालन करत खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.