नवी दिल्ली - मध्य दिल्लीतील एका 35 वर्षीय व्यक्तीने मद्यधुंद अवस्थेत पोलिसांना फोन करून पंतप्रधान मोदींना ठार मारण्याची धमकी दिली आहे. पोलिसांना हा दुरध्वनी प्राप्त झाल्यानंतर तपास सुरू केला आहे.
काही वेळातच ताब्यात
पोलीस पथकाला फार कष्ट करावे लागले नाहीत. काही वेळातच पोलिसांनी त्या व्यक्तीस शोधून काढले. त्याला ताब्यात घेतले त्यावेळी तो पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होता. काही बोलण्याच्याही स्थितीत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रूग्णालयात नेले. दरम्यान, त्याच्या घरातील सदस्यांचीही चौकशी पोलीस करत आहेत.
ड्रग्सचे व्यसन
डीसीपी प्रतापसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची ओळख पटली असून पिंटू सिंग (वय ३५) हा सुतारकाम करतो. सागरपूर भागातील कैलाश पुरी येथे राहतो. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्याला ड्रग्सचे व्यसन लागलेले आहे. बर्याचदा मद्यधुंद होतो. नशेत असताना त्याने अचानक पोलिसांना बोलावून पंतप्रधानांना जिवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे तर पंतप्रधानांना मारण्यासाठी सुपारी घेणाऱ्यास 30 कोटी रुपये देण्यार असल्याचेही म्हणाला.
मानसोपचार तज्ज्ञ करीत आहेत उपचार
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम मनोहर लोहिया रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञदेखील त्याच्यावर उपचार करत आहेत. तो विवाहित आहे आणि दारूचे व्यसन असल्याचे म्हटले जाते. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.