बसीरहाट - पंतप्रधान नरेंद्र मोदी व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात वाकयुध्द अजूनही सुरु आहे. ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा मोदींवर टीका केली. मोदी यांची छाती ५६ इंच आहे, त्यांना मारल्यास माझा हात तुटेल असे वक्तव्य ममता बॅनर्जी यांनी बसीरहाट येथील एका सभेत केले.
मोदी यांना थप्पड मारेन असे मी म्हणालेच नव्हते. त्यांना लोकशाहीची थप्पड मारेन असे म्हणाले होते. मी त्यांना थप्पड का मारु ?. त्यांना जर मी मारलं तर माझा हात तुटेल, मग मी कशी काय तुम्हाला मारु ?. तुम्ही तर ५६ इंच छातीचे आहात तु्म्हाला मी कशा काय थप्पड मारु शकते. मी तुम्हाला थप्पडच काय स्पर्शही करणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मोदी हे बंगालमध्ये आल्यानंतर त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्षावर पैसे खाण्याचा (तोलबाज) आरोप केला होता. त्यावर बोलताना ममता बॅनर्जी यांनी मोदींना लोकशाहीची थप्पड' मारायची आहे, असे वक्तव्य केले होते.