कोलकाता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्याम बाजार ते रेड रोड पर्यंत मार्चचे नेतृत्व केले. आज नेताजींची 125 वी जयंती आहे. पश्चिम बंगालमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. ममता बॅनर्जी हा दिवस देशनायक दिन म्हणून साजरा करत आहेत. बॅनर्जी यांनी श्याम बाजार ते रेड रोड पर्यंत 9 किमी लांबीचा रोड शो आयोजित केला होता. या रोड शोमध्ये मोठ्या संख्येने लोक जमले होते.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या जाहीर सभेत मोठी गर्दी झाली. श्याम बाजारात टीएमसी कार्यकर्त्यांनी शंखनादात रोड शो सुरू केला. ममता बॅनर्जी यांनी देशायक सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. नेताजी हे खरे नायक होते. त्यांचा एकतेमध्ये आणि लोकांच्या अखंडतेवर विश्वास होता, असे त्या यावेळी म्हणाल्या.
प्रजासत्ताक दिनाची परेड नेताजींना समर्पित -
आझाद हिंद फौजच्या नावाने स्मारक राजारहाट येथे बांधले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच नेताजींच्या नावावर एक विद्यापीठ देखील स्थापन केले जाईल. ज्यास राज्याकडून संपूर्ण अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर परदेशी विद्यापीठांशी करार देखील होईल, असेही त्या म्हणाल्या. यंदा कोलकातामधील प्रजासत्ताक दिनाची परेड नेताजींना समर्पित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगतिले.