मुंबई - मालेगाव 2008 बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञासिंह ठाकूर आज सोमवारी न्यायालयामध्ये दाखल झाल्या. बॉम्बस्फोटासंदर्भात गेल्या 12 वर्षांपासून विशेष न्यायालयामध्ये खटला प्रलंबित असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर या संदर्भात 3 डिसेंबर 2020 पासून नियमित सुनावणी सुरू आहे. त्याची दुसरी सुनावणी 19 डिसेंबरला विशेष एनआयए न्यायालयात घेण्यात आली होती. मात्र, सुनावणीवेळी आरोपी गैरहजर राहिल्याने विशेष एनआयए न्यायालयाने सर्व आरोपींना आज म्हणजेच 4 जानेवरीला न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते. आज सुनावणी झाल्यानंतर ती पुढे ढकलली असून उद्या म्हणजेच 5 जानेवरीला होणार आहे. तथापि, आजच्या सुनावणीत अजय राहिलकर, व दयानंद पांडे हे आरोपी गैरहजर होते.
आज सुनावणी दरम्यान प्रज्ञा सिंह यांनी न्यायालयाकडे सुनावणीला प्रकृतीचे कारण देत, हजेरी लावण्याच्या अटीतून मुभा मिळावी, अशी मागणी केली. मात्र, न्यायालयाने त्यांना यांसदर्भात अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. तसेच निर्देशानुसार सुनावणीला हजर राहण्यास सांगितले. साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासोबत बरोबरच लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सुधाकर चतुर्वेदी, समीर कुलकर्णी, रिटायर मेजर रमेश उपाध्याय, सुधाकर द्विवेदी व इतर आरोपी सुद्धा न्यायालयामध्ये दाखल झाले आहेत. अजय राहिलकर, व दयानंद पांडे हे आरोपी गैरहजर होते.
सुनावणीस विलंब -
आरोपी समीर कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमध्ये मालेगाव बॉम्ब ब्लास्ट संदर्भातील सुनावणीमध्ये विलंब होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने यासंदर्भात हस्तक्षेप करावा, म्हणून मागणी केली होती. यावर विशेष न्यायालयाकडून मुंबई उच्च न्यायालयमध्ये देण्यात आलेल्या उत्तरामध्ये डिसेंबर 2020 पासून या संदर्भात नियमित सुनावणी सुरू करण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं होत. त्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गेल्या सहा महिन्यात केवळ 14 जणांची साक्ष नोंदवण्यात आलेली असून आतापर्यंत 300 साक्षीदारांची साक्ष नोंदवणे बाकी असल्याचे सांगण्यात आले होते.
काय प्रकरण ?
29 सप्टेंबर 2008 नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात सहा लोक ठार झाले होते तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. एका मोटारसायकलमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. याप्रकरणी एनआयएने एकूण 14 जणांना आरोपी बनवले होते. महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला तपास झाला होता. नंतर हा तपास एनआयएकडे देण्यात आला. केंद्रात व राज्यात सत्तापालट झाल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेची मालेगाव स्फोटातील आरोपींबाबतची भूमिका सौम्य झाल्याचा आरोप करण्यात आला होता.