हैदराबाद - 'मलाला युसुफजाई' हे नाव आता जगभरात सर्वांना माहित झाले आहे. २०१४मध्ये सर्वात कमी वयात (१७) शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवणारी मलाला युसूफझाई पहिली महिला ठरली होती. मलालाने मुस्लीम मुलींना शाळेत जाण्याची संधी मिळावी, यासाठी दीर्घकाळ आंदोलन केले होते. २०१२ मध्ये, मलाला शाळेतून घरी परत येत असताना तालिबानी अतिरेक्यांनी तिच्या डोक्यात आणि खांद्यावर गोळी मारली होती. मात्र, सुदैवाने यातून ती बचावली.
तिचे कार्य थांबवण्यासाठी तालिबान्यांनी तिच्यावर केलेला हल्ला, हा त्यांच्यासाठी बॅकफायर ठरला. या हल्ल्यानंतर महिलांच्या आणि लहान मुलांच्या शिक्षणासाठी लढणाऱ्या जगभरातील चळवळींचा मलाला चेहरा झाली. या हल्ल्याचा जागतिक स्तरावरुन निषेध करण्यात आला. त्यावर्षीच्या मानवाधिकार दिनाच्या औचित्याने, युनेस्कोच्या पॅरीस येथील मुख्यालयात मलालाला विशेष आदरांजली वाहण्यात आली.
२०१३मध्ये तिने संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात जोरदार भाषण केले, ज्यात तिने शिक्षणासाठी स्त्री-पुरुष समानता किती महत्त्वाची आहे याबाबत आपली मतं व्यक्त केली होती. त्यानंतर संयुक्त राष्ट्रांनी तिचा जन्मदिवस (१२ जुलै १९९७) हा "मलाला दिन" म्हणून घोषित केला.
२०१७मध्ये संयुक्त राष्ट्रांचा शांतीदूत होण्याचा मान तिला मिळाला. तसेच, २०१९मध्ये संयुक्त राष्ट्रांनी आपला दशकभराचा आढावा (डिकेड इन रिव्ह्यू) प्रसिद्ध केला. यामध्ये त्यांनी मलालाला जगातील सर्वात प्रसिद्ध किशोरवयीन तरुणी म्हणून गौरवले. यासोबतच, २०१९च्या टीन व्होग मासिकानेही आपल्या दशकभराचा आढावा घेतलेल्या विशेष अंकाच्या मुखपृष्ठावर तिला स्थान दिले.
काही दिवसांपूर्वीच, मलालाने ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयात तिने पदवी मिळवली आहे. तसेच, महिलांच्या शिक्षणासाठी आणि हक्कांसाठी ती काम करत आहे.
हेही वाचा : कोरोना मृतदेहांची हेळसांड; मृत व्यक्तींचे काय आहेत अधिकार?