पणजी - राज्यात 'हिंदुस्थान एँरोनेटीकल लिमिटेड' (एचएएल) प्रकल्प सुरू व्हावा, हे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न होते, ते पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, अशी माहिती केंद्रिय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी येथे दिली. तसेच हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दक्षिण गोव्यातील चिंचणी-वास्को येथील इंडियन नेव्ही वॉटरमँनशीप ट्रेनिंग सेंटर आहे.
नाईक यांनी आज (रविवारी) येथील एनसीसीच्या वार्षिक राष्ट्रीय स्तरावरील शिबिराला भेट दिली. या भेटीदरम्यान ते बोलत होते. यावेळी नाईक शिबिरात दाखल झाल्यानंतर त्यांना 'गार्ड ऑफ हॉनर' देण्यात आला. त्यानंतर त्यांनी शिबिराची पाहणी करत शिबिरार्थी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
हेही वाचा - उत्तर कोरियाने घेतली 'अत्यंत महत्त्वाची चाचणी', अमेरिकेशी अण्वस्त्रबंदी चर्चा फिसकटली
यावेळी बोलताना नाईक म्हणाले, एचएएलचा राज्यातील प्रकल्प काही तांत्रिक कारणांमुळे रखडला होता. मात्र, त्या दूर करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. यासाठी आवश्यक जागा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. तसेच फ्रान्समधील सँफ्ररॉन कंपनीशी बोलणी झाली आहेत. लवकरच सँफ्ररॉन आणि एचएएल यांची संयुक्त बैठक होणार आहे. यात सामंजस्य करार पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे.
10 दिवसांच्या शिबिरासाठी देशभरातून एनसीसीचे 164 विद्यार्थी दाखल झाले आहेत. यामध्ये गोमंतकीयही आहेत. विद्यार्थ्यांना येथे नौकानयनाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आपली कारकीर्द घडवण्यासाठी आत्मविश्वास देत शिस्तबद्ध नागरिक घडविणे हा शिबिराचा मुख्य उद्देश्य असल्याचे नाईक म्हणाले. यावेळी नौदल आणि एनसीसीचे अधिकारी उपस्थित होते.