नवी दिल्ली : बऱ्याच काळापर्यंत साधारणपणे असे मानले जात, की गांधीजी हे विज्ञान-विरोधी, यंत्र-विरोधी आणि आधुनिकता-विरोधी वगैरे होते. याला कारण म्हणजे गांधीजींच्या लिखाणाला आजवर म्हणावी अशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. मात्र, आता जेव्हा असे होण्यास सुरुवात झाली आहे, तेव्हा लोकांच्या लक्षात येत आहे की गांधींनी त्या काळी देखील विविध वैज्ञानिक प्रयोग करुन पाहिले आहेत. गांधीजींचा अभ्यास आणि त्यांचे प्रयोग वैविध्यपूर्ण होते. मनुष्य - निसर्ग, मनुष्य-यंत्र, यंत्राच्या पलीकडे माणूस, तथ्य-मूल्य संबंध, नागरी समाजात वैकल्पिक विज्ञानाची जागा, आयुर्वेदातील नीतिशास्त्र आणि संशोधन, विज्ञान शिक्षण, विज्ञान धोरण, खादी-विज्ञान, चरख्याचे संशोधन, संशोधनात प्राण्यांचा वापर तसेच सत्याग्रह आणि संशोधन अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांचे प्रयोग पसरले आहेत. गांधींबद्दल गैरसमज होण्याचे प्रमुख कारण म्हणजे, त्यांच्या साहित्याचा अपूर्ण अभ्यास आणि चुकीचे अर्थ लावणे. सुरुवातीला त्यांच्याबद्दलचे सर्व समज, हे त्यांच्या 'हिंद स्वराज' या १९०९ मध्ये लिहिलेल्या नियतकालिकामधील लेखांवरुन लावण्यात आले होते. मात्र, त्यानंतर, चार दशके गांधीजींनी बरेच काही लिहिले आहे. या सर्व साहित्याचा काळजीपूर्वक अभ्यास होणे गरजेचे आहे.
गांधीजींच्या मते, दात कोरण्याची काडी, चरखा आणि अगदी मानवी शरीरदेखील एक यंत्र होते. त्यांना विविध काम करणाऱ्या लोकांचे निरिक्षण करायला आवडत. गांधी संस्थान-बॉम्बे सर्वोदय मंडळ आणि गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्या विस्तृत वेबसाइटला कोणी भेट दिली तर शंभूप्रसाद यांच्या विज्ञान विषयावरील गांधींच्या दृष्टिकोनाबद्दलचा एक आढावा लेख सहजपणे सापडेल. यामध्ये वाचकांच्या सोयीसाठी म्हणून 1985 पासून विश्वनाथन, विश्वास, ओबेरॉय, सहस्त्रबुद्धे यांसारख्या संशोधकांनी या दिशेने केलेल्या कार्याचे वर्णन केले आहे. शंभू प्रसाद यांनी आढावा लेखामध्ये हे स्पष्ट केले आहे, की अॅडलस हक्सले हा पहिला माणूस होता, ज्याने गांधींना आणि गांधींच्या खादी चळवळीला अवैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध केले. त्यामुळे जवळपास दोन-तीन दशके गांधींबद्दल जगभरात चुकीचे मत तयार झाले होते.
हेही वाचा : बापूंनी कसे ठेवले स्वतःला निरोगी आणि सुदृढ...
१९०४ मध्ये 'ब्रिटीश असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स'च्या सदस्यांनी दक्षिण आफ्रिकेला भेट दिली. गांधींनी त्यांना संस्थेचे नाव बदलून 'ब्रिटीश एम्पायर असोसिएशन फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ सायन्स' असे ठेवण्यास सांगितले. सोबतच, ब्रिटीश वसाहतींच्या गरजा लक्षात घेऊन, इतर वसाहतींपर्यंत आपले उपक्रम वाढविण्यास सांगितले. अशा प्रयत्नांमुळे केवळ भारतच नाही तर असोसिएशनलाही मदत होईल असे त्यांनी संस्थेला पटवून दिले. इंडियन ओपिनियन या आपल्या नियतकालिकामधून गांधींनी शास्त्रज्ञांचे धैर्य व आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला. पाश्चात्त्य विज्ञानाच्या वैज्ञानिक प्रगतीची नोंद घेताना ते त्याच्या नैतिकतेवर टीका देखील करीत असत. अल्फ्रेड वॉलेस या शास्त्रज्ञाचे शब्द ते वारंवार उद्धृत करीत असत. गांधींजींचे संपूर्ण साहित्य (खंड-२६) मध्ये एक मजेशीर उल्लेख आढळतो. गांधींना या गोष्टीचे खूप दुःख होते, की आयुर्वेदिक औषधांचा, केवळ लैंगिक उत्तेजक म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रसार होतो आहे. आणि आयुर्वेदिक चिकित्सक खरोखर संशोधन न करता, बाजारपेठेसाठी पूर्वीच्या आयुर्वेदिक वैभवाचे भांडवल करण्याचा प्रयत्न करीत होते.
सुरुवातीच्या काळात, गांधीजी आपल्या संशोधनांचा उल्लेख करताना, 'सायन्स ऑफ स्पिनिंग व्हील' असे शब्दप्रयोग करत. मात्र, नंतर नंतर, त्यांनी त्याऐवजी 'खादी विज्ञान' असा शब्दप्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यांनी 'सत्याग्रह वैज्ञानिक' ही नवी संकल्पना मांडली. सत्याग्रह आश्रमाचे संचालक मगनलाल गांधी हे महात्मा गांधींच्या अनेक संकल्पना सत्यात आणत. मात्र दुर्दैवाने, १९२८ मध्ये मगनलाल यांचे अकाली निधन झाले. ते असते, तर गांधीजींच्या आणखी अनेक संकल्पना सत्यात उतरलेल्या आपल्याला पहायला मिळाल्या असत्या.
हेही वाचा : महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा...
गांधीना पी. सी. रे आणि जे. सी. बोस या वैज्ञानिकांचे काम आवडत. १९२७ मध्ये गांधीजींनी भारतीय विज्ञान संस्थेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करत, त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव करुन दिली. १९३४ नंतर गांधीजींनी 'खेड्यांसाठी विज्ञान' ही संकल्पना मांडत, अखिल भारतीय ग्रामीण उद्योग संघटनेच्या सल्लागार मंडळाची स्थापना केली. यात सी व्ही. रमन, पी. सी. रे आणि जे. सी. बोस आणि सॅम हिगिनबॉथम सारख्या वैज्ञानिकांसह २० जणांचा समावेश होता. गांधींना वाटत, की आपल्याला प्रशासनाच्या केंद्रीकरणाची नव्हे तर विचारांच्या, कल्पनांच्या आणि वैज्ञानिक ज्ञानाच्या केंद्रीकरणाची गरज आहे. यासोबतच, गांधींनीसुद्धा मातृभाषेमध्येच विज्ञानाचे शिक्षण देण्यावर भर दिला. आवश्यक तिथे आणि गरजेनुसार इंग्रजीचा वापर चालू शकतो, असे त्यांचे मत होते.
या सर्वातून हेच निष्पण्ण होते, की महात्मा गांधी हे कधीच विज्ञान विरोधी, यंत्रविरोधी किंवा आधुनिकताविरोधी नव्हते. ते सतत नवीन गोष्टी शिकण्यास आणि स्वीकारण्यास तयार होते. आणि ते नक्कीच विज्ञानाचे आणि मानव-विज्ञानाचे समर्थक होते.
हेही वाचा : संघर्षाला तोंड देऊन शांतता प्रस्थापित करण्याचा मार्ग : गांधीवाद