चुरु (सुजानगड) - राजस्थानातील चुरु जिल्ह्यात साताऱ्यातील एका दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. घरगुती भांडणातून पती पत्नीने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुजानगड शहरातील नया बास भागात हे दाम्पत्य राहत होते. त्यांना अडीच वर्षाचा मुलगाही आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नया बास गल्लीतील सरकारी शाळेजवळ एका भाड्याच्या खोलीत महाराष्ट्रातील दाम्पत्य राहत होते. महिलेचा पती हनुमंत हा कल्हई(पॉलिश) करण्याचे काम करत होता. हनुमंत याने घरातील पंख्याला गळफास लावून घेतला. सोमवारी सकाळी कुटुंबियांना याची माहिती मिळाली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. पतीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पत्नी राधिकानेही विषारी औधष पिऊन आत्महत्या केली.
पोलीस अधीक्षक नरेंद्र शर्मा यांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर आत्महत्या केली असावी, असे प्राथमिकदृष्या दिसत आहे. दोन्ही मृतदेहांचे शविच्छेदन करण्यात येणार असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.