नवी दिल्ली / मुंबई - महाराष्ट्राच्या सरकार स्थापनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्री पद तर, काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होणार आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार आहे. उद्या (ता. २८) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याआधी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक झाली. ती तीन तासांहून अधिक काळ चालली.
'महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाबाबत, विविध आयोगांबाबत, महामंडळांबाबत अंतिम चर्चा पूर्ण झाली. उद्या ठरल्याप्रमाणे संध्याकाळी शपथविधी होणार आहे. सर्व पक्षांची सहमती झाली आहे. त्यानंतर अधिवेशन बोलवले जाईल आणि विश्वासदर्शक ठराव आणला जाईल. ३ तारखेपर्यंत विश्वासदर्शक ठराव आणण्याची मुदत आहे. ३ तारखेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल. अध्यक्ष काँग्रेगचा असेल तर उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल. या सरकारमध्ये एकच उपमुख्यमंत्री असेल आणि ते राष्ट्रवादीचा असेल. मध्यरात्रीपर्यंत कोण कोण शपथ घेणार त्यांची नावे दिली जातील,' असे पटेल म्हणाले.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याच वेळी ७ किंवा ९ मंत्र्यांचेही शपथविधीही होतील. हे चित्र लवकरच स्पष्ट होईल. शिवसेनेचे १५ मंत्री, राष्ट्रवादीचे १३ मंत्री आणि एक उपमुख्यमंत्री तर, काँग्रेसचेही १३ मंत्री आणि एक विधानसभा अध्यक्ष अशी पदे मंत्रिमंडळात दिली जाणार आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीच्या सूत्रांनी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री पद मागितले नसल्याचे म्हटले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली होती. 'तुम्ही केलेल्या तोंडी विनंतीनुसार, तुम्हाला मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे गुरुवारी सायंकाळी ६:४० वाजता कार्यालय आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येईल,' असे राज्यपालांनी पत्रात म्हटले होते.