नवी दिल्ली - काँग्रेसचे राज्यसभा खासदार व बिहार निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख अखिलेश सिंह यांनी दावा केला आहे, की तिसऱ्या टप्प्यातील मतदानात सर्वाधिक जागा महागठबंधनच्या पारड्यात जातील. त्याचबरोबर जनतेत एनडीएबद्दल प्रचंड चीड असून मागील दोन टप्प्यात मतदान जागांवरही महागठबंधनचे उमेदवार अधिक विजयी होतील.
आज बिहार निवडणुकीसाठी तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. या टप्प्यात ७८ जागांवर मतदान होत आहे.
बिहारमधील जनता महागठबंधनच्या बाजुने असून एनडीएच्या कामगिरीवर नाराज आहे. याची जाणीव नितीश कुमारांना झाल्यामुळेच त्यांनी ही निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याची भावनिक साद मतदारांना घातली आहे. मात्र बिहारमध्ये एनडीएला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागेल, असेही अखिलेश सिंह म्हणाले.
अखिलेखसिंह म्हणाले, की महागठबंधनने बिहारच्या जनतेसाठी विकासाचा जाहीरनामा मांडला आहे आणि बिहारची जनता विकासाच्या मुद्द्यावर मतदान करत आहेत. मात्र एनडीए व खासकरून भाजप निवडणुकीसाठी पाकिस्तान, सेक्शन ३७०, राम मंदिर व एनआरसी-सीएए सारखे मुद्दे प्रचारात आणून जनतेत भ्रम निर्माण करत आहे.
अखिलेख सिंह म्हणाले, की प्रसार सभांमध्ये नितीशकुमार सांगत नाहीत, की तरुणांना रोजगार कसा पुरवणार, बिहारमध्ये नवे उद्योग कधी सुरू होणार, मोठ्या शैक्षणिक संस्था कधी उघडणार, राज्यातील आरोग्य व्यवस्था कधी सुधारणार, लोकांना पुरापासून कधी मुक्ती मिळणार, राज्यातील कायदा व सुव्यवस्था कधी सुधारणार.