चेन्नई - भारत आणि चीनदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या अनौपचारिक शिखर परिषदेसाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारतात येणार आहेत. तामिळनाडूच्या महाबलीपुरम गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांची भेट होणार असल्याचे समजत आहे. या पार्श्वभूमीवर महाबलीपुरम गाव हे या परिषदेसाठी सज्ज झाले आहे.
या परिषदेच्या निमित्ताने आमच्या गावात स्वच्छता होते आहे, रस्ते दुरुस्त केले जात आहेत आणि सगळीकडे पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. हे गाव पवित्र स्थळ म्हणून आधी प्रसिद्ध होतेच, मात्र या परिषदेमुळे आणखी जास्त लोकांना हे गाव माहित होईल आणि मोठ्या प्रमाणावर पर्यटक तसेच भक्त येथे येतील. त्यामुळे, एकंदरीत या परिषदेचा विशेष फायदा या गावाला होणार आहे, असे एका स्थानिक शिल्पकाराने सांगितले.
याआधी डीएमके पक्षाचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनीदेखील या परिषदेसाठी तामिळ नाडू आणि महाबलीपुरमची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता. या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन जोराने तयारीला लागले आहे. विशेष सुरक्षा व्यवस्थाही लागू केली गेली आहे.
दुसरे भारत-चीन अनौपचारिक शिखर संमेलन (२आयआयसीएस) हे ११ ते १३ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे.
हेही वाचा : भारत-चीन अनौपचारिक शिखर परिषद : गैरसमज अन् अस्वस्थता दूर करण्याची संधी