वॉशिंग्टन डी. सी. - अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका लेखिकेने लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला आहे. न्यूयॉर्कच्या एका पत्रकात छापलेल्या वृत्तानुसार या महिलेने आरोपात म्हटले आहे, की १९९० च्या दरम्यान मैनहट्टन डिपार्टमेंट स्टोरच्या एका ड्रेसिंग रूममध्ये ट्रम्प यांनी आपले लैंगिक शोषण केले होते.
ही महिला लेखिका असून ती महिलांच्या समस्यांसंबंधी कॉलम लिहितेय. दोन दशकापूर्वी ट्रम्प यांनी बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. दरम्यान ट्रम्प यांनी या आरोपांचे खंडन करत, या महिलेला आपण आयुष्यात आतापर्यंत कधीही भेटलो नसल्याचे म्हटले आहे. हे वृत्त केवळ अफवा असल्याचे म्हणत याबाबत काहीही पुरावा नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या महिलेला आपल्या नव्या पुस्तकाचा खप वाढवायचा असल्याने ती हे सर्व करत असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.
ट्रम्प यांच्यावर आरोप करणारी महिला ईजीन कैरोलने ट्रम्प यांच्यावरील आरोपांचा आपल्या आगामी पुस्तकात उल्लेख केला आहे. या पुस्तकात तिने लिहिले आहे, की त्यावेळी आम्हा दोघांमध्ये मैत्री होती. याचाच फायदा घेत ट्रम्प यांनी मला धक्का देत ड्रेसिंग रूमच्या भींतीकडे ढकलले आणि माझ्यावर जबरदस्ती करण्यास सुरूवात केली.
दरम्यान, ट्रम्प यांच्यावर अशा प्रकारचे आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. २०१६ च्या राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणूक प्रचारादरम्यानही अनेक महिलांनी ट्रम्प यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र, तेव्हाही ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळत या महिला खोटे बोलत असल्याचे म्हटले होते. अशात आता या प्रकरणात कोणते नवे खुलासे होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.