कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये 'जय श्रीराम' न म्हटल्याने एका मदरसा शिक्षकाला ट्रेनमधून धक्का मारून बाहेर फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या संदर्भात शिक्षकाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मोहम्मद शाहरूख असे या शिक्षकाचे नाव आहे.
शाहरूखने आपल्या तक्रारीत म्हटले, की २० जून रोजी मी दक्षिण २४ परगाना जिल्ह्यातून हुगली येथे प्रवास करत होतो. त्यावेळी काही व्यक्ती माझ्याजवळ आले आणि मला जय श्रीराम असे बोलायला सांगितले. परंतु, मी त्यास नकार दिल्याने त्यांनी मला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ट्रेन पार्क सर्कस स्थानकात दाखल होण्यादरम्यान त्यांनी मला ट्रेनमधून बाहेर ढकलून दिले. यासंदर्भात मी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचेही यावेळी शाहरूखने सांगितले.
दरम्यान, दोन दिवसापूर्वीच चोरी केल्याच्या आरोपावरून झारखंडमधील २२ वर्षीय तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तरुणाचा रुग्णालयात मृत्यू झाला. मारहाणी दरम्यान त्याला 'जय श्रीराम' आणि 'जय बजरंगबली' असे म्हणायला सांगितले जात होते.