भोपाळ - देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलीस लाठ्या-काठ्यांचा प्रसाद देत आहेत. मात्र, मध्यप्रदेशातील खंडवा पोलिसांनी विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबत आहेत. काही ठिकाणी पोलीस घराबाहेर पडलेल्या लोकांच्या फूलाचा हार घालून स्वागत करत आहेत. तर काही पोलीस गाणे गात लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहेत.
खंडवा पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना थांबवून त्यांना पुष्पहार घालून घरात राहण्याचा सल्ला दिला. एवढेच नाही तर पोलिसांनी विनाकारण रस्त्यावर भटकणार्या लोकांना योगासने शिकवली. तसेच कोरोना कसा टाळावा? याचे मार्गदर्शन केले. खंडवाच्या अतिरिक्त एसपी सीमा अलावा म्हणाल्या की, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना रस्त्यावर फिरण्याबद्दल पश्चाताप वाटावा, यासाठी लोकांना रस्त्यावर योग करायला लावला जात आहे.
इतकेच नाही तर बर्याच ठिकाणी पोलीस गाणी गात लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहेत. खंडवा पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अताउल्ला खान यांनी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी गाण्याद्वारे लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले.