भोपाळ - मध्य प्रदेश सरकार 'लव्ह जिहाद'विरोधात नवा कायदा आणणार आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात धर्मांतरे आणि लव्ह जिहादची वाढती प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने सरकार 'मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020' आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन कायद्यात जबरदस्तीने धर्मांतरासाठी पाच वर्षांपर्यंतची शिक्षा देण्यात येईल.
राज्य सरकारचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा मंगळवारी म्हणाले की, विधानसभेच्या पुढील अधिवेशनात राज्यात धर्मांतर करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विवाहांना प्रतिबंध करण्यासाठी विधेयक आणण्याची तयारी सरकार करत आहे. 'मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020' असे या विधेयकाचे नाव आहे. अशा प्रकारे धर्मांतरे घडवून आणणे हा अजामीनपात्र गुन्हा घोषित करून, मुख्य आरोपी व त्यातील सहभागींना पाच वर्षांची कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे.
हेही वाचा - अजित पवारांच्या 'या' वक्तव्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला निषेध
गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत लव्ह जिहादविरोधात कायदा आणण्याविषयी मुद्दा उपस्थित केला होता. मुख्यमंत्री चौहान म्हणाले की, राज्यात लव्ह जिहाद आणि लग्नासाठी धर्मांतर कोणत्याही स्वरूपात चालणार नाही. हे पूर्णपणे अवैध आणि बेकायदेशीर आहे. याविरोधात राज्यात कायदा करण्यात येईल.
गुन्हेगार घटक, विशेषत: मुलींविरूद्ध गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जावी. या संदर्भात नियमितपणे पाठपुरावा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री चौहान यांनी दिले आहेत.
हेही वाचा - कोविड-19 मुळे द्वितीय विश्वयुद्धाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात नवीन प्रोटोकॉल विकसित करण्याची संधी - मोदी