तामिळनाडू - तिरूपूर जिल्ह्यातील उथुकुलीजवळ आठ वर्षांच्या बालकाचा मृतदेत सापडला आहे. पल्लागौंडेंपलायम या तळ्यातून तो हस्तगत करण्यात आला. संबंधित बालक तिसऱ्या इयत्तेत असून त्याची पोलिसांना ओळख पटली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका प्रेमी युगुलाने त्याचा खून केल्याचे तपासात समोर आले आहे.
गुरुवारपासून मुलगा घरी न आल्याने त्याच्या पालकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. यानंतर पोलिसांना देखील कळवण्यात आले. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या एका व्यक्तीला पल्लागौंडेंपलायम या तळ्यात त्याचा मृतदेह तरंगताना दिसला; आणि त्याने पोलिसांशी संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी त्याच्या गळ्यावर जखमा झाल्याचे दिसले.
या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर ऊथुकुली पोलिसांनी अजित या २१ वर्षांच्या मुलाला अटक केले. तसेच त्याच्या अल्पवयीन प्रेयसीला देखील ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केल्यानंतर मृत बालकाने संबंधित युगुलाला पुथुर पल्लापलायम तळ्याच्या काठी प्रणयक्रीडा करताना पाहिल्याचे त्यांनी कबूल केले. कोणालाही संशय येऊ नये, यासाठी मृतदेहाची पल्लागौंडेंपलायम तलावात विल्हेवाट लावल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास ऊथुकुली पोलीस करत आहेत.