किशनगंज - एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी बिहारमधील किशनजंग येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टोला लगावला आहे. ओवेसी यांनी नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्या युतीची तुलना 'लैला-मजनू'शी केली आहे. नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यात लैला-मजनूपेक्षाही अधिक प्रेम असल्याचे म्हटले आहे.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे प्रेम प्रेम लैला-मजनूपेक्षाही अधिक गहिरे आहे. जेव्हा नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'प्रेम कथा' लिहिली जाईल, तेव्हा त्यांच्यातील लैला कोण आणि मजनू कोण हे मला विचारु नका. ते तुम्हीच ठरवा. लैला आणि मजनू ऐका, जेव्हा तुमची 'प्रेम कथा' लिहिली जाईल तेव्हा त्याच्यात प्रेमाऐवजी तिरस्कार लिहिला जाईल. जेव्हापासून दोघे एकत्र आले तेव्हापासून भारतात हिंदू आणि मुस्लिमांममध्ये तणाव निर्माण झाला असे या कथेत लिहिले जाईल’, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
ओवेसींनी यावेळी केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांच्यावरही टीका केली. मेनका गांधींनी मुस्लिमांना धमकी दिली आहे, असे ते म्हणाले. 'तुम्ही आम्हाला मते दिली नाहीत तर, तुम्हाला नोकऱ्या मिळणार नाहीत अशी धमकी त्यांनी मुस्लिमांना दिली आहे. पंतप्रधानांनी दिलेली सबका साथ, सबका ही विकासची घोषणा केली, ती पूर्ण खोटी आहे,’ अशी टीका त्यांनी केली आहे.