नवी दिल्ली - मध्य प्रदेश सरकार 'लव्ह जिहाद'विरोधात नवा कायदा आणणार आहे. यावरून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी लव्ह जिहादवरून भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला. भाजपाने देशाचे विभाजन करण्यासाठी आणि जातीय सलोखा बिघडवण्यासाठी लव्ह जिहाद हा शब्द निर्माण केला, अशी टीका गेहलोत यांनी केली. विवाह हा व्यक्तिगत स्वतंत्रतेसंबंधित आहे. यावर अंकुश लावण्यासाठी कायदा तयार करणे असंवैधानिक आहे, असेही ते म्हणाले.
लव्ह जिहाद हा एक शब्द आहे जो भाजपाने देशाचे विभाजन आणि जातीय सलोखा बिघडवण्यासाठी बनविला आहे. विवाह हा वैयक्तिक स्वातंत्र्याचा विषय आहे, त्याला आळा घालण्यासाठी कायदा आणणे पूर्णपणे घटनाबाह्य असून हा कायदा न्यायालयात टिकणार. जिहादला प्रेमात स्थान नाही, असे गेहलोत म्हणाले.
मध्य प्रदेशच्या अधिवेशनात 'लव्ह जिहाद'वर कायदा -
मध्य प्रदेश सरकार 'लव्ह जिहाद'विरोधात नवा कायदा आणणार आहे. आगामी विधानसभा अधिवेशनात धर्मांतरे आणि लव्ह जिहादची वाढती प्रकरणे रोखण्याच्या उद्देशाने सरकार 'मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2020' आणण्याच्या तयारीत आहे. या नवीन कायद्यात जबरदस्तीने धर्मांतरासाठी पाच वर्षांपर्यंतची शिक्षा देण्यात येईल.
लव्ह जिहाद विरोधी कायद्याची गरज - खट्टर
हरयाणा सरकारनेही आता लव्ह जिहाद विरोधात कायदा करण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी हरयाणाच्या फरिदाबादमध्ये एका मुलीची, लग्नाला नकार दिल्याने हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण चांगलेच तापले असून, लव्ह जिहादचा आरोप करत संपूर्ण देशामध्ये या घटनेविरोधात आंदोलन सुरू आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनीदेखील लव्ह जिहादविरोधात कायदा करण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले.