नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे आज लोकसभेचे कामकाज तीन वेळा थांबवावे लागले. सायंकाळी पाच वाजता, सहा वाजता आणि सात वाजता अशा तीन टप्प्यांमध्ये लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
केंद्राने लागू केलेले नवे कृषी कायदे रद्द करावेत यासाठी विरोधकांच्या सुरू असलेल्या गोंधळामध्येच कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी 'आर्बिट्रेशन अँड कॉन्सिलेशन (दुरुस्ती) विधेयक, २०२०' संसदेमध्ये सादर केले. या विधेयकाची माहिती देताना प्रसाद म्हणाले की या विधेयकात नामनिर्देशित लवादाच्या संस्थांच्या माध्यमातून लवादांची त्वरित नेमणूक करण्याची सोय केली गेली आहे. सरकारने याबाबत अगोदर जारी केलेल्या अध्यादेशाची जागा हे विधेयक घेणार आहे.
यानंतर विरोधकांच्या गोंधळामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास पुन्हा लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. भाजपा खासदार राजेंद्र अगरवाल हे या सत्राचे सभापती होते. त्यांनी विरोधकांना जागेवर बसण्याची विनंती केली.
"लोकसभेच्या सभापतींच्या विनंतीचा पुनरुच्चार करत, मी तुम्हा सर्वांना जागेवर बसण्याची विनंती करतो. तुम्हाला सर्व विषयांवर चर्चा करण्याचा हक्क आहे, त्यामुळे कृपया गोंधळ करु नका. कामकाज सुरू होऊद्या, आणि सुरू राहूद्या" असे ते म्हणाले.
मात्र, यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिल्यामुळे त्यांनी पुन्हा सात वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब केले.
हेही वाचा : दिल्ली सरकार देणार ई-वाहनांना चालना; प्रदूषण कमी करण्यासाठी निर्णय