भुवनेश्वर - लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात ओडिशातील स्थलांतरीत कामगार अडकून पडले आहेत. या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशी चर्चा केली. कामगारांना सुरक्षितपणे राज्यात माघारी आणण्यासाठी दोन्ही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली.
कामगारांच्या सुरक्षित वापसीसाठी व्यवस्था करण्याची विनंती पटनाईक यांनी उद्धव ठाकरेंकडे केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही चर्चेत सहभाग घेतला होता. कामगार माघारी ओडिशाला पोहचण्याआधी त्यांची नोंदणी करण्यावर प्रधान यांनी भर दिला.
स्थलांतरीत कामगारांना बसने माघारी नेण्याची व्यवस्था केली जाईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, इतर पर्यायांवरही चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने यासंबधी माहिती दिली आहे. दोन्ही राज्याचे वरिष्ठ अधिकारी समन्वय साधून वाहतूकीची व्यवस्था करणार आहेत. तसेच कामगार माघारी परतल्यानंर त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.