नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये 3 मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊन हेच कोरोना महामारीविरोधातील शस्त्र आहे, असे भाजप नेते गिरीराज सिंह म्हणाले.
कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लॉकडाऊन हेच सर्वांत मोठे शस्त्र आहे. देशातील लॉकडाऊन वाढवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांनी कौतूक केले आहे. जर भारतामध्ये वेळीच लॉकडाऊन लागू केले नसते. तर भारतातही स्पेन, इटली आणि अमेरिकासारखी परिस्थिती निर्माण झाली असती. त्यामुळे सर्वांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करा आणि सामाजिक आंतर राखा, असे आवाहन गिरीराज सिंह यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सामाजिक अंतर राखणे, खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्क वापरणे ,हात धुणे याप्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र, देशात कोरोनाचे थैमान असूनही काही नागरिक त्याचे पालन करत नसल्याचे चित्र असून लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केल्याचे पाहायला मिळत आहे.