नवी दिल्ली - भारातामध्ये कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 350 पेक्षा अधिक झाली असून तब्बल 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील १५ जिल्ह्यात २३ मार्च ते २५ मार्च दरम्यान लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.
भारतात कोरोना विषाणुच्या विरोधातील ही सामूहिक लढाई आहे. यापासून सुरक्षित राहण्यासाठी विषाणूसंबधी जागरुक राहणे आणि काळजी घेणे हा एकमेव उपाय असल्याचे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले. तसेच याला रोखण्यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न केले जात असल्याचही ते म्हणाले. नागरिकांनी स्वत:ला या संक्रमणापासून वाचवण्यासाठी वेगळे राहण्याचे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये करण्यात येणाऱ्या लॉकडाउनमध्ये नोएडा, गौतमबुद्ध नगर आणि गाजियाबाद या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे दिवसभर जनता कर्फ्यू पाळण्यात आला आहे. तसेच देशवासियांनी टाळ्या-थाळ्या अन् घंटेचा नाद करत कोरोना विषाणूविरोधात लढणाऱ्या लोकांचा सन्मान केला. योगी आदित्यानाथ यांनी थाळ्या-टाळ्या अन् घंटानाद करून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.