नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन येत्या 3 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यानुसार लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक नियमावली जाहीर करण्यात आली. यामध्ये शाळा, विमानसेवा आणि रेल्वेसेवा बंद राहणार असून सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक केले आहे. तसेच ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले नाहीत, त्या भागांना २० एप्रिलनंतर सूट मिळणार आहे.
मार्गदर्शक नियमावली...
- कोणत्याही संस्थेने कामाच्या ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येऊ देऊ नये. तसेच कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- सर्व आंतरराज्यीय विमान, रेल्वे, शैक्षणिक संस्था, औद्योगिक, चित्रपटगृहे, व्यायामशाळा बंद राहतील. तसेच लग्न आणि अंत्यसंस्कार अशावेळी जास्त लोक एकत्र येऊ नये.
- रुग्णालय, औषधांची दुकाने, बँका, एटीएम आणि औषधांशी संबंधित कंपन्या सुरू राहतील. तर दारू, गुटखा, तंबाखूची विक्रीवर बंदी राहील.
- थुंकीमधून कोरोना पसरतो म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार.
- 20 एप्रिलपासून कृषी, फलोत्पादन, शेती, कृषि उत्पादनांची खरेदी, मंडई खुली होऊ शकते. तसचे शेती यंत्रसामग्रीशी संबंधित दुकाने खुली राहतील.
दरम्यान देशामध्ये एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 11 हजार 439 झाला आहे, यात 9 हजार 756 एक्टिव्ह केसेस आहेत. तर 1 हजार 306 जण पूर्णत: बरे झाले आहेत. 377 जणांचा मृत्यू झाल्याची माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.