मुंबई - एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर वेगाने विकसित करण्यात आलेले परळ टर्मिनस उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहे. दादर स्थानकातील प्रवासी भार कमी व्हावा या उद्देशाने परळ स्थानकाचे रूपांतर परळ टर्मिनसमध्ये केले आहे. उद्या (३ मार्च) परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल धावणार आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत परळ टर्मिनसचे उदघाटन करण्यात येईल. परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ८ वाजून ४८ मिनिटांनी चालविण्यात येणार आहे. परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी सुटेल. कल्याण दिशेकडे १६ फेऱ्या आणि परळ दिशेकडे १६ फेऱ्या अशा एकूण ३२ फेऱ्या चालविण्यात येईल.
परळ टर्मिनससह कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, सायन, दिवा येथील पादचारी पुलांचे उद्घाटन करण्यात येईल. सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ बदलापूर स्टेशन चे सुधारण्यासाठी पायाभरणी आणि सरकता जिन्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यासह पुणे नागपूर हमसफर एक्सप्रेस आणि मध्य रेल्वे उपनगरीय नेटवर्क वर १५ डब्यांच्या अतिरिक्त इमयू सेवेला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. त्याचबरोबर नेरळ माथेरान गाडीमध्ये विस्टाडोम कोचचे लोकार्पण होणार आहे.