नवी दिल्ली - भाजपने आज लोकसभेसाठी १८२ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात आले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार लालकृष्ण अडवाणी यांना गांधीनगर मतदारसंघातून डावलण्यात आले आहे. त्यांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपच्या संसदीय मंडळाची आज उमेदवारांच्या निवडीबीबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना डावलण्यात आले आहे. ७५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या नेत्यांना तिकीट द्यायचे नाही असा विचार भाजपमध्ये सुरू होता. त्यामुळे मार्गदर्शक मंडळात असलेल्या अनेक नेत्यांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरु होती.
देशाचे माजी उप पंतप्रधान लालकृष्ण आडवाणी गांधीनगर मतदारसंघातून सलग ६ वेळा लोकसभेवर निवडून आले आहेत. २०१४ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आडवाणी यांनी नाराजीचा सूर काढला होता. त्यानंतर आडवाणी यांच्या नेतृत्वाला एकप्रकारे उतरती कळा लागली असून सध्या ते भाजपात पूर्णपणे अडगळीत पडले आहेत.