जयपूर - राजस्थान उच्च न्यायालयाने सचिन पायलट यांच्या याचिकेवरील सुनावणी स्थगित केली आहे. पायलट यांनी याचिकेमध्ये सुधारणा करण्यासाठी काही वेळ मागितला होता. त्यांना हा वेळ देत उच्च न्यायालयाने सुनावणी स्थगित केली. यापुढील सुनावणी ही उच्च न्यायालयाच्या एका खंडपीठासमोर होणार आहे.
काँग्रेसच्या संसदीय बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे सचिन पायलट आणि १८ बंडखोर आमदारांना राजस्थान विधानसभा सभापतींनी अपात्र ठरवले होते. याविरोधात पायलट यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज दुपारी या याचिकेवर सुनावणी सुरू करण्यात आली होती.
यावेळी, या आमदारांच्या वतीने खटला लढणारे वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी न्यायालयाकडे आणखी वेळ मागितला. या आमदारांना सभापतींनी दिलेल्या आदेशाची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी याचिकेमध्ये बदल करायचा आहे, असे न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायालयाने त्यांची विनंती मंजूर केली.
मंगळवारी सभापती जोशींनी या बंडखोर आमदारांना अपात्र ठरवणारी नोटीस पाठवली होती. यावर शुक्रवारपर्यंत उत्तर देण्याचा आदेश त्यांना देण्यात आला होता.
काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता सर्वांसमोर आला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे त्यांचे उपमुख्यमंत्रिपद काढून घेण्यात आले आहे. या सर्व घटनांमुळे भाजपला फायदा होताना दिसून येत असला, तरी पायलट यांनी आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.