मुझफ्फरपूर (बिहार) : भारतीय नौदलात पहिली महिला पायलट बनण्याचा मान सब-लेफ्टनंट शिवांगी यांनी कमावला आहे. भारतीय नौदलातील एव्हिएशन विभागात हवाई वाहतूक नियंत्रण विभागात महिला अधिकाऱ्यांचासुद्धा समावेश असतो. परंतु, शिवांगी ही नौदलातील पहिली महिला पायलट ठरली आहे.
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील फतेहाबादमधील येथील शिवांगीला लहापणापासूनच पायलट बनण्याची इच्छा होती. तिच्या या स्वप्नांना पालकांनी पाठिंबा दिला आणि शिवांगीने तिचे स्वप्न सत्यात उतरवले.
शिवांगीने २०१०मध्ये डीएव्ही पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर तिने बारावी सायन्समधून केल्यानंतर इंजिनिअरिंग केले. एसएसबी परीक्षेद्वारे तिची सबलेफ्टनेंट म्हणून निवड झाली. प्रशिक्षणानंतर तिची पहिली महिला पायलट म्हणून निवड करण्यात आली.
शिवांगीने नौदलात येण्यापूर्वी हवाई दलाचे सहा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर तिला नौदलातील पिलाटस पीसी ७ या विमानाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेऊन शिवांगी आता पायलट झाली आहे.
पुरुषांचं वर्चस्व असलेल्या नौदलात पहिली महिला पायलट होणं, काही सोपी गोष्ट नाही. मात्र, हीच गोष्ट शिवांगीने खरी करून दाखवली असून मुली कुठल्याही क्षेत्रात कमी नसल्यांचेही तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. तिच्या कामगिरीने जिल्हाच नाही तर, तर संपूर्ण बिहारचं नाव पुन्हा एकदा देशात झळकले आहे.