लखनऊ - उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ शहराचा देशातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांमध्ये समावेश होतो. लखनऊमध्ये अनेक ऐतिहासिक इमारती, तलाव असल्याचे पाहायला मिळते. मात्र लखनऊ आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध आहे, ते म्हणजे शहरामध्ये असलेल्या एका घंटाघरामुळे, हे घंटाघर लखनऊच्या हुसैनाबाद परिसरात आहे. देशातील सर्वात मोठे घंटाघर अशी याची ओळख आहे. घंटाघराची उंची तब्बल 221 फूट असून, या घंटाघराची निर्मिती 100 वर्षांपूर्वी करण्यात आली.
या घंटा घराबद्दल माहिती देताना इतिहासकार सांगतात की, हे घंटाघर म्हणजे ब्रिटिश वास्तूकलेचा सर्वोत्तम नमुना आहे. याची निर्मिती तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर सर जॉर्ज कूपर यांच्या सन्मानार्थ 1882 ते 1887 च्या दरम्यान करण्यात आली. या घटांघराला तयार करण्यासाठी तब्बल 5 वर्षांचा कालावधी लागला. वीट आणि चुण्याचा वापर करून या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. अभियंता फ्रेडरिक विलियम्स स्टीवन्स यांच्या मार्गदर्शनाखाली या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. या इमारतीची उंची तब्बल 221 फूट असून, तेव्हा ही इमारत बनवण्यासाठी 90 हजारांचा खर्च आला होता.
या घंटाघरामध्ये आहे देशातील सर्वात मोठं घड्याळ..
या घंटा घरामध्ये ठेवण्यात आलेल्या घड्याळाची निर्मिती ब्रिटनच्या जे. डब्ल्यू. बेसन या कंपनीकडून करण्यात आली आहे. जगात या प्रकारच्या केवळ तीनच घड्याळी आहेत. ही घड्याळ देशातील सर्वात मोठी घड्याळ आहे. या घड्याळाची उंची 6 फूट तर रुंदी 3 फूट आहे. या घड्याळामध्ये 50 कीलो वजनाचे 3 काटे आहेत. या घड्याळाच्या निर्मितीसाठी तेव्हा 27 हजार रुपयांचा खर्च आला होता. या घड्याळीमध्ये 5 घंट्यांचा समावेश करण्यात आला आहे.
घड्याळ पुन्हा सुरू करण्यासाठी 18 लाखांचा खर्च..
1984 साली हे घड्याळ बंद पडले होती. मात्र त्यानंतर 2013 साली या घड्याळाला पुन्हा सुरू करण्यात यश आले. या घड्याळाला पुन्हा सुरू करण्यासाठी तब्बल 18 लाखांचा खर्च आला आहे.
घंट्यांच्या ठोक्यावरून लोक ठरवत होते आपली दिनचर्या..
इतिहासकार या घड्याळाबाबत अधिक माहिती देताना सांगतात की, या घड्याळात बसवण्यात आलेल्या घंट्याचा आवाज अर्ध्या शहरात ऐकू जायचा. अनेक लोकांनी या घंट्याच्या आवाजाच्या आधारे आपली दिनचर्या बनवली होती. त्या काळात प्रत्येक घरात घड्याळे नसत, या घड्याळाच्या पडणाऱ्या टोल्यांवरुन लोक आपली दिनचर्या निश्चित करत असत.