नवी दिल्ली - जगाच्या नकाशावर आर्थिक महाशक्ती म्हणून देशाला मानाचे स्थान मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज 88 वा वाढदिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधींसह विविध नेत्यांनी सिंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राहुल गांधींनी आपल्या अधिकृत टि्वटर खात्यावरून मनमोहन सिंग यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत
सोशल मीडियावर ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्याची आशा व्यक्त केली. 'डॉक्टर मनमोहन सिंगजी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी ईश्वराकडे कामना करतो की, तुम्हाला प्रदीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभावं'
डॉ.मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला होता. मनमोहन सिंगांच्या वडिलांचे नाव गुरुमुखसिंग आणि आईचे नाव अमृतकौर आहे. 1947 ला भारत-पाकिस्तान फाळणीवेळी मनमोहन सिंग यांचे कुटुंब अमृतसर येथे आले होते.
डॉ. मनमोहन सिंग यांची 28 वर्षांची प्रदीर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे. 1991 मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी डॉ. मनमोहन सिंग यांचा आपल्या मंत्रिमंडळात थेट अर्थमंत्री म्हणून समावेश केला होता. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानंतर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली होती. मनमोहन सिंग हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. नम्र आणि शांत स्वभावाचे मनमोहन सिंग 2004 ते 2014 असे दहा वर्ष भारताचे पंतप्रधान होते. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर सलग दहा वर्षे पंतप्रधानपदाचा मान मिळालेले ते तिसरे पंतप्रधान आहेत.
मनमोहन सिंग यांची कारकिर्द -
- 1957 ते 1965 - चंदिगडमधील पंजाब विश्वविद्यालयात प्राध्यापक
- 1969-1971 - दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक
- 1976 - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयात मानद प्राध्यापक
- 1982 -1985 - भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
- 1985 - 1987 – भारताच्या योजना आयोगाचे उपाध्यक्ष
- 1990 -1991 - भारतीय पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार
- 1991 - नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमंत्री
- 1991 – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले
- 1995 – दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य
- 1996 - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक
- 1999 - दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले
- 2001 – तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेताइ.स. 2004 – भारताचे पंतप्रधान
- 2014 - भारताचे दुसऱ्यांदा पंतप्रधान