नवी दिल्ली - देशातील जवळपास ७४ टक्के लोकांना न्यूज चॅनेल बातम्यांपेक्षा मनोरंजनाचे साधन असल्याचे वाटत आहे. 'आयएएनएस सी-व्होटर'कडून मीडिया वापर ट्रॅकरच्या नुकत्याच हाती आलेल्या निष्कर्षांमधून ही बाब समोर आली आहे.
सर्वेक्षणात सहभागी नागरिकांना 'भारतामध्ये न्यूज चॅनेल बातम्यांऐवजी मनोरंजनाचे साधन झालेत असे वाटते का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ७३.९ टक्के लोकांनी याला होकार दिला. २२.५ टक्के लोकांनी असे नसल्याचे सांगितले तर २.६ टक्के लोकांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. लिंग आधारावर ७५.१ टक्के पुरुषांनी तर ७२.७ टक्के महिलांनी 'भारतामध्ये न्यूज चॅनेल बातम्यांऐवजी मनोरंजनाचे साधन झालेत असे वाटते का?' या प्रश्नावर होय अशी प्रतिक्रिया दिली. वेगवेगळ्या वयोगटातीलही जास्तीत-जास्त लोकांनी या प्रश्नाला होकारार्थी उत्तर दिले. ५५ वर्षांपर्यंतच्या ७० टक्के लोकांची तर ५५ वर्षांहून वरील वयोगटातील ६८.७ टक्के लोकांची यावर सहमती आहे.
विशेष म्हणजे निम्न, मध्यम आणि उच्च शिक्षित लोकांमध्येही या प्रश्नावर जवळपास एक सारखेच होकारार्थी उत्तर मिळाले आहे. या तिन्ही वर्गातील लोकांनी ७० ते ७६ टक्के प्रमाणात आपली सहमती दर्शवली आहे. उत्पन्नाच्या बाबतीत विचार केल्यास मध्यम उत्पन्न असलेल्या ७३.२ टक्के तर उच्च उत्पन्न असलेल्या ७५.१ टक्के लोकांनी या प्रश्नावर होय म्हटले आहे. वेगवेगळ्या जाती समूहांचेही हेच म्हणणे आहे. दलित समुदाय ७२.१, सवर्ण हिंदू ७३.५, शीख समुदायाशी संबंधित ८५.३ टक्के लोकांनाही असे वाटते की, न्यूज चॅनेल बातम्यांऐवजी मनोरंजनाचे साधन झालेत. या सर्वेक्षणासाठी देशातील सर्व जिल्ह्यांमधील ५ हजारहून अधिक लोक सहभागी झाले होते.