पाटना - येत्या 28 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सुरुवात होणार आहे. ही निवडणुक तीन टप्प्यात पार पडेल. मात्र निवडणुकीपूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगतांना दिसत आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सुशिल कुमार मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला जीवे मारण्यासाठी लालू प्रसाद यादव यांनी तांत्रिक विद्या आणि काळ्या जादूचा प्रयोग केला होता, असे ट्विट सुशिल कुमार मोदी यांनी केले आहे.
तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी आपल्याला मारण्यासाठी काळ्या जादूचा प्रयोग केला होता, असा दावा मोदी यांनी केला आहे. आपल्याला मारण्यासाठी लालू यांनी मिर्झापूरमध्ये देखील तांत्रिक पूजा देखील केल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव हे निवडून येण्यासाठी नेहमी तांत्रिक विधी, काळी जादू, आणि पशू हत्या यासरख्या आघोरी पूजा करत असल्याचा आरोपी देखील त्यांनी केला आहे.
लालू प्रसाद यादव हे सध्या तुरुंगात असून, त्यांना चारा घोटाळा प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालू प्रसाद यादव हे तुरुंगात असल्याने, आता बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीची सर्व जबाबदारी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव हे संभाळत आहेत.