पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठपली आहे. असे असताना सर्व पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. यातच, राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी राजद प्रमुख लालू प्रसाद यादवांवर गंभीर आरोप केला आहे. आपला जीव घेण्यासाठी लालूंनी मांत्रिकाच्या मदतीने जादूटोणा करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप मोदींनी केला आहे.
लालू यादव अंधविश्वासू
"लालू यादव हे एवढे अंधविश्वासू आहेत, की त्यांनी आपल्या मांत्रिकाच्या सांगण्यावरून पांढरा कुर्ता वापरणे बंद केले. तसेच, तांत्रिक शंकर चरण त्रिपाठी यांची पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणूनही निवड करण्यात आली." अशा आशयाचे ट्विट करत सुशील मोदींनी लालूंच्या अंधविश्वासूपणावर तोफ डागली आहे. लालू प्रसाद यादव यांचा जनतेवर विश्वास नाही. त्यामुळे ते निवडणूक जिंकण्यासाठी बळी देणे, काळी जादू करणे आणि आत्म्यांची प्रार्थना करणे अशा प्रकारच्या गोष्टी करतात, असेही मोदी म्हणाले. मात्र, एवढे सगळे करुनही ना त्यांनी आपली सत्ता राखली, ना ते तुरुंगातून बाहेर पडू शकले. आणखी १४ वर्षे ते असेच तुरुंगात राहतील असा टोलाही मोदींनी लगावला.
मला मारण्याचा केला प्रयत्न
लालू प्रसाद यादव यांनी तीन वर्षांपूर्वी तांत्रिकाच्या मदतीने मला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी मिर्झापूरमधील विंध्याचल धाम येथे तांत्रिक पूजा केली होती असा आरोप मोदींनी केला.
येत्या नवमीला देणार बळी
बिहार विधानसभा निवडणुकांपूर्वी लालू प्रसाद यादव हे तीन मेंढ्यांचे बळी देणार आहेत. येत्या नवमीला त्यांच्या रांचीमधील बंगल्यात हा विधी पार पडेल असा दावाही यावेळी मोदींनी केला.
मुख्यमंत्री बंगल्यावर काळी जादू?
२००५मध्ये जेव्हा भाजपची सत्ता आली, तेव्हा मुख्यमंत्री निवास सोडण्यासाठी लालूंनी दीड महिन्याचा काळ घेतला होता. यादरम्यान आपण या बंगल्यामध्ये काळ्या जादूशी संबंधित काहीतरी ठेवले आहे, जेणेकरुन येथे कोणीही राहू शकणार नाही असे लालू यांनी सांगितले होते. मात्र, त्याच बंगल्यात राहून नितीश कुमार गेली १५ वर्षे बिहारच्या जनतेची सेवा करत आहेत असे मोदी म्हणाले.