नवी दिल्ली - प्रसिद्ध गायिका लेडी गागा हिने रविवारी अपल्या टि्वटर खात्यावरून एक संस्कृत श्लोक टि्वट केला आहे. तो श्लोक वाचून भारतीय चाहते खुश झाले मात्र श्लोक संस्कृतमध्ये असल्यामुळे जगाला या टि्वटचा अर्थच लागला नाही. लेडी गागाने आपल्या टि्वटमध्ये 'लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु' हा श्लोक लिहला आहे.
जगातील सर्वंच ठीकाणाचे लोक आनंदी आणि स्वतंत्र राहावे आणि माझ्या जिवनातील विचार, शब्द, आणि कार्याने त्या लोकांच्या आनंदात आणखी भर घालावी, असा 'लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु' या श्लोकचा अर्थ आहे.
पुर्ण श्लोक असा...
स्वस्तिप्रजाभ्यः परिपालयंतां न्यायेन मार्गेण महीं महीशाः ।
गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनोभवंतु ॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः
लेडी गागाचे हे टि्वट सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत तब्बल 50 हजार लोकांनी या टि्वटला पंसती दिली आहे. याचबरोबर जवळपास 11 हजार लोकांनी हे रिटि्वट केले आहे.
फेब्रुवारीमध्ये 'अ स्टार इज बॉर्न' चित्रपटातील 'शॅलो' या गाण्यासाठी लेडी गागाला ऑस्करचा 'बेस्ट ओरिजीनल साँग' साठीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ऑस्करच्या व्यासपीठावरही या गाण्याचं भरपूर प्रचंड कौतुक झालं. ऑस्कर मिळाल्याची घोषणा होताच लेडी गागा अत्यंत भावूक झाली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिनं दोन मिनिटं आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.