बरेली - उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील भहेडी तालुक्यात मंदिर परिसरात मांस खाल्ल्याच्या कारणावरून गोरक्षकांनी काही कामगारांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ बनवून त्यांनी तो समाजमाध्यमांवर व्हायरल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भहेडी तालुक्यातील शेखुपुरा या गावात एका घराचे बांधकाम करण्यासाठी काही कामगार आले होते. जवळच असलेल्या मंदिराजवळील झाडाखाली त्यापैकी चार कामगार जेवण करण्यास बसले होते. त्याच वेळी काही गोरक्षक तेथे आले. कामगारांच्या डब्यात मांस असल्याच्या कारणावरून त्यांनी या कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तेथे आणखी सहा-सात जण आले. या सर्वांनी त्या कामगारांना पट्टा, लाथा - बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी ते कामगार दयेची भीक मागत होते. मात्र, मारहाण करणाऱ्यांनी त्यांची दया आली नाही. या सर्व घटनेचा व्हिडिओ बनवून त्यांनी सोशल मिडियावर व्हायरल केला आहे.
या घटनेचा व्हिडिओ हाती लागल्यानंतर बरेली ग्रामीणच्या पोलिसांनी ७ जणांविरूध्द गुन्हे दाखल केले आहे. आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले.