बंगळुरू - कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन म्हणजेच 'केएससीए' हे अनेक पर्यावरणपूरक निर्णय घेत आले आहे. सौरऊर्जा, बायोगॅस अशा गोष्टींचा त्यांनी आत्तापर्यंत वापर केला असून आता पर्यावरणाच्या दृष्टीने त्यांनी आणखी एक पाऊल उचलले आहे.
क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी, 'केएससीए'ने चिन्नास्वामी मैदानावर 'प्लास्टिक बॉटल श्रेडर' बसवले आहे. केएससीएचे अध्यक्ष, आणि माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांच्या हस्ते या मशीनचे अनावरण करण्यात आले.
हे मशीन एका वर्षात साधारणपणे चार लाख प्लास्टिक बाटल्यांचे तुकडे करू शकते.. या बाटल्यांपासून झालेल्या प्लास्टिकच्या तुकड्यांचा पुनर्वापर करून बूट, शर्ट आणि टोप्यांसारख्या वस्तू बनवता येऊ शकतात.
बिन्नींना आशा आहे, की केएससीएचा हा निर्णय इतर राज्यांच्या क्रिकेट असोसिएशन्ससाठी प्रेरणादायी ठरू शकतो. तर, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनला अशी आशा आहे, की हा प्रयोग नक्कीच यशस्वी होणार. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि आपला देश प्लास्टिकमुक्त होण्यास मदत होईल.
हेही वाचा : नो टू सिंगल यूज प्लास्टिक : पंतप्रधानांकडून पारितोषिक मिळालेले 'हे' गाव आता होतंय प्लास्टिकमुक्त