बंगळुरू - कर्नाटकात कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पाण्याची पातळी धोकादायक रेषेच्या जवळ पोहोचली आहे. येथे झालेल्या मुसळधार पाऊस आणि महाराष्ट्रातून कर्नाटकाच्या उत्तर भागाकडे वाहून आलेल्या पाण्यामुळे ही परिस्थिती झाल्याचे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडल्यामुळे बागलकोट जिल्ह्यातील अलमट्टी धरणावर कृष्णा नदी व तिच्या उपनद्या धोक्याच्या पातळीजवळ पोहोचल्या आहेत, असे राज्याचे जलसंपदा विभागातील अधिकारी म्हणाले.
बेळगाव जिल्ह्यातील रायबाग व अथणी तालुक्यातील सखल उंचीवरील पूल आणि बंधारे मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेले आहेत. येथील रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक आणि सामान्य जनजीवन विसकळीत झाले आहे. शिवमोगा चिकमंगळूर पाणलोट क्षेत्रात पाऊस पडल्यामुळे बल्लारी जिल्ह्यातील होसापेते येथील तुंगभद्रा नदीच्या धरणातही पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.
जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे चिकमंगळूर दक्षिण कन्नड कोडागु उडपी जिल्ह्यातील डोंगराळ भागात भूस्खलन झाले. तर, नेत्रावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे पाण्याने पात्राची मर्यादा ओलांडली आहे. गावे आणि शहरांमध्ये पाणी घुसण्यापासून रोखण्यासाठी धरणांमधून पाणी सोडण्यात आले आहे. कोडागू जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्यामुळे कावेरी नदी व तिच्या उपनद्या ओसंडून वाहू लागल्या आहेत. नदीचे उगमस्थान असलेल्या बाघमंडला आणि तळकावेरीमध्ये पूर आला आहे.