नवी दिल्ली - कोरोनाची झळ राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली आहे. येथील एका कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला कोरोनाची लागण झाली आहे आणि हा कर्मचारी त्याच्या संपर्कात आला. त्यामुळे राष्ट्रपती भवनातील २५ कुटुंबांना स्वतःच्या घरात विलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित कर्मचाऱ्याच्या एका नातेवाईचा मृत्यू झाला होता. त्यासाठी हा कर्मचारी गेला होता. त्याठिकाणी रविवारीच पॉझिटिव्ह अहवाल आलेला एक कोरोनाबाधित नातेवाईक देखील सहभागी झाला होता. त्यामुळे राष्ट्रपती भवनातील कर्मचाऱ्याला बिर्ला मंदिर कॉम्प्लेक्सजवळील क्वारंटाईन केंद्रात पाठवण्यात आले आहे. त्याच्या घराच्या आजूबाजूला राहणाऱ्या २५ कुटुंबांना खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःच्या घरात विलगीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. सर्वांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत.