कोलकाता- पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या 50 वर्षीय कार्यकर्त्याची क्रूड बॉम्ब टाकून हत्या करण्यात आली आहे. दलू शेख असे या मृत भाजप कार्यकर्त्याचे नाव असून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दलू याची हत्या कोणत्या कारणांसाठी करण्यात आली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. लाभपूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. मात्र, ही हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला आहे. तसेच पोलीस घटनास्थळी खूप उशिरा पोहोचल्याचाही आरोप करण्याता आला आहे.
प्रदेश भाजपचे महासचिव सायंतन बसु यांनी या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचे म्हटले आहे. तृणमूलच्या गुंडांनी वारंवार भाजपच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले आहे. मात्र, हे सहन केले जाणार नाही. आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे बसु म्हणाले आहेत.