कोटा - राजस्थानमधल्या कोटा जिल्ह्यातील केशवपुरा गावाने प्लास्टिक मुक्तीचा यशस्वी प्रयोग राबवला आहे. २ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्लास्टिक वापरावर निर्बंध घालण्याचे देशवासियांना आवाहन केले होते. या आवाहनाला केवळ ६०० लोकवस्ती असलेल्या केशवपुरा या गावाने चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी त्यांचे संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त केले आहे.
११ जुलैपासून गावातील सर्व तरुणांनी एकत्र येत गाव प्लास्टिकमुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी गावातील सर्व प्लास्टिक गोळा करून एका खड्ड्यात जमा केले आणि त्यानंतर ते पेटवून दिले. तरुणांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे केशवपुरा हे गाव पूर्ण प्लास्टिकमुक्त झाले आहे. गावातील सर्व लोकांनी प्लास्टिक वस्तू न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदी करण्यासाठी या गावातील प्रत्येकजण कापडी पिशवी किंवा कागदाच्या पिशवीचा वापर करत असल्याचे पाहायला मिळाले. ११ जुलैपासून या गावात झालेल्या ११ कार्यक्रमांमध्ये एकदाही पाल्स्टिकचा वापर केला नाही.
प्लास्टिकच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते. पाळीव प्राण्यांना मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा धोका असतो. पाळीव प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांचा मृत्यूही होतो. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखणे गरजेचे आहे. केशवपुरा गावाने आसपासच्या गावांना प्लास्टिकमुक्त होण्याचा एक चांगला संदेश दिला आहे.