तिरुवनंतपूरम - केरळ राज्यातील थ्रीसुर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या पोटातच कात्री राहिल्याचा प्रकार समोर आला आहे. वैद्यकीय उपचारावेळी करण्यात आलेला दुर्लक्षपणा कधी-कधी फारच धोकादायक ठरतो. याचा प्रत्यय या घटनेमधून आला आहे.
थ्रीसुरमधील मूळ कोरकेंचेरी येथील रहिवासी जोसेफ पॉल यांच्यावर 25 एप्रिलला थ्रिसूर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली होती. दोन महिन्यानंतर पॉल यांनी एका खासगी रुग्णालयातील डॉक्टरांची भेट घेतली. तेव्हा तपासणीत असे दिसून आले आहे की, शस्त्रक्रियेदरम्यान त्याच्या उदरात कात्री राहिली होती.
गेल्या आठवड्यात झालेल्या दुसर्या शस्त्रक्रियामध्ये कात्री बाहेर काढण्यात आली आहे. जोसेफ आता बरा होत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. जोसेफच्या कुटुंबीयांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.