तिरुवअनंतपूरम - नववर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच केरळ सरकारने शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सर्व शाळा सुरू होणार नसून काही शाळांनाच परवानगी दिली आहे. मागील दहा महिन्यांपासून राज्यातील शाळा बंद आहेत. शाळा कधी सुरू होणार याबाबत अनिश्चित्तता होती. मात्र, आता दहावी बारावीचे वर्ग काही प्रमाणात सुरू करण्यात आले आहेत.
कोरोना नियमावलीचे पालन अनिवार्य -
विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना कोरोना नियमावलीचे पालन करत शाळेत यावे लागणार आहे. यासोबतच ऑनलाईन शिक्षणाचाही व्यवस्था सुरू ठेवली आहे. शाळेतील सर्वांनी मास्क घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. शाळेच्या गेटवर सर्वांची थर्मल तपासणी होणार आहे. त्यानंतरच शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.
एका बाकावर एकच विद्यार्थी -
शाळेत आल्यानंतरही विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाच्या पाश्वभूमीवर कडक नियमांचे पालन करणे अनिवार्य असले तरी विद्यार्थी आनंदात आहेत. आरोग्य मंत्री के. के शैलजा यांनी शाळेतील नियमावलीचे पालन करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.