तिरुवअनंतपूरम - सध्या कोरोनाच्या भीतीने प्रत्येकालाच ग्रासले आहे. मात्र, यात काही सकारात्मक गोष्टीही समोर येत आहेत. केरळमध्ये कोरोनाची लागण झालेली एक परिचारिका पुन्हा आपल्या कामावर रूजू झाली आहे. यामुळे कोरोना आजार भयंकर असला तरी त्यावर मात होऊ शकतो, हेच यातून दिसते.
कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर कोरोनाला संपवण्याची शपथच सदर नर्सने घेतली. ३२ वर्षीय रेश्मा मोहनदास हिने स्वत: ला वचन दिल्यानंतर घराकडे पावलं टाकली. याठिकाणी सदर परिचारिकेला १४ दिवस क्वारंटाईन करण्यात आले. यानंतर १४ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला.
कोरोनावर मात करून रेश्माने काही दिवसांतच पुन्हा कामावर रूजू होऊन रुग्णांची सेवा करणे सुरू केले. दरम्यान, आयसोलेशन काळात रेश्माने व्हॉट्सअॅप ग्रुपवर एक मेसेज टाकला होता. यात तिने ' मी एका आठवड्यातच तुला (कोरोना) हरवून ही रूम सोडेन'. यानंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करून रेश्मावर कामावर रूजू झाली. यामुळे रेश्माच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रेश्मा रुग्णालयात थॉमस आणि मरियम्मा यांची गेल्या १२ मार्चपासून सुश्रुषा करत होती. यांच्याशी संपर्क आल्यानेच रेश्माला कोरोनाची लागण झाली. या दाम्पत्याने कधीच मास्क घातलेले नसायचे, अशीही माहिती समोर आली आहे.
रेश्मा सुरुवातीला रुग्णालयातील वेगळा विभागात कार्यरत होती. मात्र, ती ४ तास आयसीयू विभागात काम करत होती. याच ठिकाणी ती विषाणूच्या संसर्गात आली आणि येथीलच एका विंगमध्ये ती रुग्ण म्हणून दाखल झाली.
'मी थॉमस आणि मरियम्मा या दाम्पत्याच्या फार जवळ गेली होती. त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे माझे कर्तव्य होते, असेही रेश्माने सांगितले. २३ मार्चला सकाळी घशात दुखायला लागल्यानंतर रेश्माला पहिल्यांदा काहीतरी झाल्याचे समजले. ते पहिले लक्षण होते. यानंतर रेश्माने लगेच मुख्य नर्सला याबाबत कळवले आणि त्यांनी ही माहिती डॉक्टरांना सांगितली. यानंतर डॉक्टरांनी तिला साधा ताप तपासून रेश्माची रवानगी आयसोलेशन वॉर्डमध्ये केली ज्याठिकाणी ती त्या दाम्पत्याची काळजी घेत होती.
रेश्माबरोबर संपर्कात आलेल्या २० परिचारिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. २४ मार्चला रेश्माला आपण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले. डोकेदुखी आणि अंगदुखी हीच लक्षणे होती. बाकी मला काहीच झाले नव्हते, असे रेश्माने सांगितले.