तिरुवअनंतपुरम - सोने तस्करी आणि मनी लाँड्रींगचे प्रकरण केरळ राज्यात मागील काही महिन्यांपासून गाजत आहे. राज्य सरकारमधील बड्या अधिकाऱ्यांचा यात समावेश असल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींची एकत्र चौकशी करण्याचे नियोजन सक्तवसुली संचलनालय (ईडी) करत आहे.
ईडीने आरोपींची कोठडी मागितली
सोने तस्करी प्रकरणातील आरोपी सारीथ, स्वप्ना सुरेश, संदीप नायर आणि एम. शिवशंकर यांची ईडीने कोठडी मागितली आहे. एर्नाकुलम जिल्हा न्यायालयात ईडीने यासंबंधीची याचिका दाखल केली आहे. सोने तस्करी प्रकरणात केरळचे माजी माहिती तंत्रज्ञान सचिवांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीतून नवी माहिती समोर येण्याची आशा अधिकाऱ्यांना आहे.
एम. शिवशंकर याची चौकशी सुरू
न्यायालयाच्या आदेशानुसार शिवशंकर यांना ईडीने २८ ऑक्टोबरला ताब्यात घेतले. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चौकशी करण्याची परवानगी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानुसार सलग दोन दिवस त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. एम. शिवशंकर हे केरळचे माहिती तंत्रज्ञान सचिव तसेच मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे प्रधान सचिव होते. मात्र, सोने तस्करी प्रकरणात आरोप झाल्यानंतर त्यांना प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले होते. त्यांच्यावर सोने तस्करी करणाऱ्या स्वप्ना आणि संदीप नायर यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
दुबईवरून विमानाद्वारे केरळात आणण्यात आलेल्या राजनैतिक सामानात 30 किलो सोने आढळून आले होते. या सोन्याची तस्करी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या संरक्षणाखाली करण्यात येत होती. कारण राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानाची तपासणी केली जात नाही. या तस्करीप्रकरणी युएई कौन्सलेट विभागाचा माजी कर्मचारी पी. एस सारीथ याला सीमा शुल्क विभागाने 5 जुलैला अटक केली होती. याप्रकरणी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आरोपींसोबत संबंध असल्याचे तपासात उघड होत आहे. आरोपी स्वप्ना आणि संदीप नायर यांना बंगळुरुतून अटक करण्यात आली आहे.