तिरुवनंतपूर - केरळ सोने तस्करी प्रकरणाची चौकशी करत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाने शनिवारी निलंबित आयएएस अधिकारी एम. शिवशंकर यांची 5 तास चौकशी केली. शिवशंकर यांना शनिवारी दुपारी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात बोलाविण्यात आले आणि त्यांची चौकशी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचे माजी प्रधान सचिव आयएएस अधिकारी एम शिवशंकर यांची पुन्हा चौकशी झाली आहे. सोन्याच्या तस्करीत हात असल्याचा आरोप झाल्यानंतर त्यांना प्रशासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याआधी ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आणि केरळच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. त्यांच्यावर सोन्याची तस्करी करणाऱ्या स्वप्ना सुरेश आणि सुरेश नायर यांच्या संपर्कात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आपला मुख्यमंत्री कार्यालयात संपर्क होता, अशी माहिती सुरेशने दिल्याचे शुक्रवारी ईडीने विशेष न्यायालयात सांगितले. सुरेशची विचारपूस केली असता, आपला शिवशंकर यांच्याशी निकटचा संबंध असल्याचे त्याने सांगितल्याचे ईडीने म्हटले आहे. दरम्यान, सोन्याच्या तस्करी प्रकरणी सीमा शुल्क विभागाने 11 जुलै रोजी स्वप्ना सुरेश आणि सुरेश नायर या दोघांना अटक केली होती.