नवी दिल्ली - राजधानी दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण(एलएनजेपी) रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांसाठी व्हिडिओ कॉलची सुविधा सरकारने उपलब्ध करून दिली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या सुविधेचे उद्धाटन केले. प्रत्येक वार्डात आणि वार्डाबाहेर टॅबलेट ठेवण्यात आले आहेत. त्याद्वारे रुग्णांना आपल्या मित्र आणि नातेवाईकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधता येणार आहे.
दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालय 17 मार्चला कोरोना विशेष रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रुग्णालयात आत्तापर्यंत 2 हजार 700 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. 2 हजार खाटांची क्षमता असलेले हे दिल्लीतील एकमेव रुग्णालय आहे.
आत्तापर्यंत रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधता येत नव्हता. मात्र, हा प्रश्न आता सोडविण्यात आला आहे. प्रत्येक कोरोना वार्डात आणि बाहेर टॅबलेट ठेवण्यात आले आहेत. त्याद्वारे रुग्णांना नातेवाईकांशी संवाद साधता येणार आहे, असे केजरीवाल म्हणाले. त्यांनी यावेळी काही रुग्णांशी संवादही साधला.
केजरीवाल यांनी एलएनजेपी रुग्णालयातील डॉक्टरांचे कौतुक केले. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कोरोनाचा प्रसार होईल म्हणून कित्येक दिवस घरी जात नाहीत. सर्वजण कठीण परिश्रम करत आहेत. पीपीई कीट घालून काम करणे किती कठीण आहे, याची कल्पना करा. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून काहीही त्रुटी राहत नाही, असे केजरीवाल म्हणाले.