जयपूर - राजस्थानच्या मेवाड विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. राजस्थान पोलिसांनी या संदर्भात चार विद्यार्थ्यांना अटक केली आहे. २२ नोव्हेंबरला काही कारणावरून या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली होती.
गंगरार पोलीस ठाण्याचे निवासी अधिकारी, एल. आर. विष्णोई यांनी याबाबत माहिती दिली. इश्फाक अहमद कुरेशी या काश्मीरी विद्यार्थ्याने दिलेल्या माहितीनुसार तक्रार नोंदवल्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, कलम १५१ किंवा सीआरपीसी अंतर्गत चार विद्यार्थ्यांना अटक करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.
अटक करण्यात आलेले विद्यार्थी हे बिहारचे होते. काश्मीरी विद्यार्थ्यांना विद्यापीठाबाहेर गेट पास देण्यात आले होते. मात्र, बिहारी विद्यार्थ्यांना गेट पास मिळाले नसल्याने त्यांनी वॉचमनकडे त्याबाबत तक्रार केली. यानंतर चौकशी करण्यात आली असता, काश्मीरी विद्यार्थ्यांनी आपले यात विनाकारण नाव घेतले जात आहे, आणि हा बिहारी विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनादरम्यानचा मुद्दा आहे असा पवित्रा घेतला. त्यामुळे बिहारी विद्यार्थ्यांनी रागात काश्मीरी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. यामध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यानंतर परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. दोन्ही बाजूच्या विद्यार्थ्यांनी हे प्रकरण सोडवले आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : 'लोकांना गॅस चेंबरमध्ये ठेवण्यापेक्षा एकाच झटक्यात मारून टाका', न्यायालयाची जळजळीत टीका