श्रीनगर - राफ्टींग करण्यासाठी गेलेले पर्यटक बोटीतून नदीत पडले. त्याचक्षणी त्यांना वाचविण्यासाठी गाईडने जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारली आणि ५ पर्यटकांचा जीव वाचवला. मात्र, स्वत:चा जीव वाचवण्यात त्या गाईडला अपयश आल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. रौफ अहमद दार असे मृत झालेल्या गाईडचे नाव आहे. लिड्डर नदी, पहलगाम (जिल्हा अनंतनाग) येथे ३१ मे रोजी ही घटना घडली.
घटनेविषयी बोलताना रौफचा भाऊ म्हणाला, आम्ही पर्यटकांसोबत नदीत राफ्टींगसाठी गेलो होतो. जाण्याआधी नदीची पाणीपातळी वाढली आहे, असे त्यांना बजावले होते. परंतु, त्यांनी ऐकले नाही. नदीत बोट उतरवल्यानंतर अवघ्या २ ते ३ मिनिटातच बोट पलटी झाली. यादरम्यान, रौफने पर्यटकांना वाचवले. परंतु, पाण्याच्या भोवऱ्यात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.
रौफ हा वास्तव जीवनातील नायक असून त्याने पर्यटकांनसाठी स्वत:चा जीव पणाला लावला, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल नाईक यांनी दिली आहे.
पर्यटनासाठी काश्मीरची प्रतिमा मलिन आहे. परंतु, रौफने एक उदाहरण प्रस्थापित केले आहे. पर्यटक आमच्यासाठी घरच्या सदस्यांपेक्षा कमी नाहीत असे रौफने दाखवून दिले आहे. रौफ हा त्याच्या घरात पैसे कमवणारा एकमेव सदस्य होता. त्याच्या घरच्यांसाठी काहीतरी मदत करावी, अशा प्रतिक्रिया रौफच्या गावकऱ्यांनी दिल्या आहेत.