नवी दिल्ली - काँग्रेसने आज लोकसभेच्या १० उमेदवारांची ९वी यादी जाहीर केली आहे. यामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय या यादीत महाराष्ट्रातील ४ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
कार्ती यांना तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कार्ती चिदंबरम यांच्यावर अनेक आरोप आहेत. 'आयएनएक्स मीडिया' केसप्रकरणी कार्ती यांची चौकशी सुरू आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात कार्ती यांच्यावर लाचखोरीचा आरोप आहे. याप्रकरणी गेल्या महिन्यात कार्ती यांना अटकही झाली होती.
कार्ती चिदंबरम यांच्यावरील आरोप -
आयएनएक्स मीडियाला विदेशी फंड आल्यानंतर अर्थमंत्रालयाकडून मंजुरी दिली, जेव्हा की 'फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाला' (एफआयपीबी) विदेशी फंड मिळण्यापूर्वीच अनुमती देणे गरजेचे होते. बोर्डाने ही परवानगी ४.६२ कोटी रुपयांसाठी दिली होती. यानंतरही २००७ मध्ये ३०५ कोटी रुपये अवैधरित्या आले. मॉरिशसच्या गुंतवणूकदारांचा पैसा आल्यानंतर पीटर मुखर्जीने कार्तीशी संपर्क केला. यानंतर अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली. हा पैसा कार्तींशी संलग्न असलेल्या कंपन्यांकडे गेला होता, असे तपास संस्थांचे म्हणणे आहे. यातील ५ कोटी रुपयांची माहिती मिळाली असल्याचा दावा करण्यात आला आहे.